चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील माजी नगरसेवकावर बाळू मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाच हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून प्रत्येकाच्या हातात गावठी कट्टा असल्याचेही समोर आले आहे.
चाळीसगाव पालिकेचे माजी नगरसेवक बाळू मोरे हे दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले होते. याचवेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दरम्यान, घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये एका कारमधून हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून कारमधून उतरताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे प्रत्येकाच्या हातात हातात गावठी कट्टा होता. सुरुवातीला तीन हल्लेखोर ऑफिसमध्ये शिरतात. त्यानंतर दोघं पळत-पळत मागे जातात.
अवघ्या काही सेकंदात गोळ्या झाडल्यानंतर पाचही हल्लेखोर बाहेर पडतात. या हल्लेखोरांच्या दिशेने एक तरुण जाण्याचा प्रयत्न करताच कारमध्ये बसताना एक हल्लेखोर त्याला पिस्तुल दाखवतो. त्यानंतर तो तरुण मागे पाळत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, घटनेनंतर मोरे यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा आहे.
















