चाळीसगाव (प्रतिनिधी) आठवडे बाजारातून बाजार करून घरी परतत असतांना भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळल्याने बापलेकाचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ शुक्रवारी घडली.
कळमडू येथे सालदार म्हणून काम करणारा मोतीराम नारायण पावरा (वय ४५) हे पत्नी समरा पावरा वय ३५ आणि मुलगा विकास मोतीराम पावरा (वय ३) व मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होते. शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे आठवडे बाजार असल्याने मोतीराव पावरा हे शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी पत्नी व मुलांना घेऊन बाजारात आले होते. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली. यात मोतीराम पावरा, त्यांचा मुलगा विकास पावरा (वय ३) हे दोघे जागीच ठार झाले. तर पत्नी समरा पावरा ही गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
















