जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये महाविकास आघाडीने मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार आंदोलने केली. आता याच आंदोलनात भाजप नेत्यांबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांची जीभ घसरली. चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी खोचक आणि घणाघाती टीका अनिल पाटील यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून हे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे, असं पाटील म्हणाले. मलिक यांच्या पाठी आघाडीतली सर्व आमदार खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.