मुंबई (वृत्तसंस्था) कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता असून ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललं आहे.
जागतिक स्तरावर ला निनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गतवर्षी १५ मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला होता. परतीचा पाऊसही ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यातही राज्यात अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. याच बदलत्या हवामानामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २३ आणि २४ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आधीपासूनच अवकाळीनं राज्याची चिंता वाढवली आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे.
ला निनो परिस्थिती म्हणजे काय?
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. यालाच सदर्न ऑसिलेशन असं म्हणतात. ला-निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होतं. त्याचा परिणाम फक्त इथेच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातल्या सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायानं ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होतं.