मुंबई (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकरणात जून महिन्यात कोर्टात विचारणा याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच भुजबळ हे जामिनावर बाहेर असल्याने त्यांनी जपून बोलावं, असा इशाराही पाटील यांनी दिला. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी यांची माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केलीये.
हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, “ममता दिदिंनी संघर्ष करुन पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. ‘मेरा पश्चिम बंगाल मैं नही दूंगी’ असं म्हणत जखमी झालेली महिला देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरलेले असतानाही त्यांनी विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली होती. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राग येण्याची गरज नव्हती. ते पुढे जाऊन म्हणाले, भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत. अन्यथा तुमचा जामिन रद्द करु, अशा आशयाची प्रतिक्रिया देताना. आज भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखं ही मंडळी बोलू लागली आहेत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे तत्काळ भुजबळांची माफी मागावी.”
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या नव्या दाव्यांवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “परमबीर सिंह प्रकरणी मी सातत्यानं सांगत आलोय की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवण्यात आली त्याचा मास्टर माईंड कोण? कशासाठी ठेवली? हे अजून एनआयएनं जाहीर केलेलं नाही. प्रसार माध्यमांनी अनेकदा सचिन वाझेंसोबतच परमबीर सिंह यांच्याकडे संशयाची सुई दाखवली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंहावर आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच एका क्रिकेट बुकीनं आपल्याकडून पैसे घेतल्याचाही आरोप परमबीर सिंहांवर केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची तत्काळ चौकशी होण्याची गरज आहे.” असंही ते म्हणाले.