मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं. तर भाजपला केवळ एकच जागा जिंकता आली. चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असं म्हणत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की, “आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे”, असे ते सांगत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना सहापैकी केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नगापूरचे मतदारसंघदेखील त्यांनी या निवडणुकीत गमावले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने, असंही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे. नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱयाने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे.
लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळय़ातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात पन्नास हजारांवर मतांनी विजय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा. वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.