श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मिरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागलं आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आहे. जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत २ महिलांसह १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २० हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शनिवारी सकाळी शहरात चेंगराचेंगरी होऊन २० जण जखमी झाले. त्याचवेळी १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे २० जणांना रेस्क्यू केलं आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, कटरा येथील रुग्णालयातील बीएमओ डॉक्टर गोपाल दत्त यांनी सांगितले की, आम्हाला सध्या ६ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्याकडे अद्याप पूर्ण तपशील नाहीत.