जळगाव (प्रतिनिधी) रात्रीच्या सुमारास मंदिरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी दोन मंदिरातील चांदीची मुर्ती, पादुका व दानपेटीतील रोकडसह इतर साहित्य चोरुन नेले. तसेच तिसऱ्या मंदिरात प्रवेश केला. मात्र तेथे काहीही मिळून न आल्याने चोस्यांनी पेनड्राईव्ह लांबवला. मंदिरांमध्ये चोरी केल्यानंतर चड्डी गँगने बंद घरात डल्ला मारुन तेथून ऐवज चोरुन नेला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. एकाचवेळी तीन मंदिरांसह एका घरात चोरट्यांनी चोरी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील रायसोनी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पाठोपाठ एक तीन मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुका, गणपतीची साधारण दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नसल्याने त्यामध्ये नेमकी किती रक्कम होती हे समजू शकले नाही. त्यानंतर चोरट्यांनी तेथूनच जवळ असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या दानपेटीसह तिजोरीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरुन नेली. त्या मंदिरापासून अवघ्या पाचशे मिटर अंतरावर असलेल्या शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तेथे त्यांच्या हाती रक्कम अथवा मूर्ती मिळून न आल्याने चोरट्यांनी तेथून पेनड्राईव्ह चोरुन नेला.
बाहेर गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात डल्ला
मोहाडी रोडवरील ऑक्सिजन पार्कजवळील रहिवासी केतन सुरेश चौधरी हे कुटुंबासह बाहेर गावी गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्या घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. घरमालक घरी नसल्याने नेमके चोरीला काय गेले हे समजून आले नाही.
चोर चोर ओरडताच चोरटे पसार
रायसोनी नगरातील गजानन महाराज मंदिरासमोर राहणारे चौधरी हे ठाणे येथे नोकरीस आहे. त्यांना ठाणे येथे जायचे असल्याने ते जाण्याकरीता पहाटे लवकर उठले होते. त्यांना मंदिराजवळ चार जण संशयास्पदरित्या फिरतांना दिसताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. चोरट्यांना त्याची कुणकुण लागताच ते तेथून पसार झाले..
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर घटनांचा उलगडा
श्री गजानन महाराज मंदिरात चोरी झाल्याने त्या विषयी रायसोनी नगरातील नागरिक रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकीरता आले होते. त्यावेळी त्यांना इतर दोन मंदिरांसह केतन चौधरी यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद
चोरीच्या या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चौघे चोरटे हातात शस्त्र घेऊन रस्त्याने आले. त्यांनी एका घराकडे पाहत जात ते मंदिरांत शिरले आणि तेथे चोरी केल्याची सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे तर एकाने कमरेला बांधलेली दिसत असून ते फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिसांचा नाहीच पण देवाचाही धाक उरलेला नाही
शिवनेरी नर्मदेश्वर या मंदिरात सहा ते सात महिन्यांपूर्वी चोरी होऊन चोरट्यांनी दानपेटीच लांबविली होती. त्यामुळे तेथे दानपेटी ठेवलेली नसल्यामुळे चोरट्यांना याठिकाणी काहीही मिळून आले नाही. एकाच रात्री तीन मंदिरांसह एका घरफोडी झाल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा तर नाहीच, मात्र आता देवांचाही धाक राहिलेला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.