लोणावळा (वृत्तसंस्था) मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन भीषण आग लागली. या आगीत 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळयाजवळ खंडाळा हद्दीत ओव्हर ब्रीजवर सोमवारी एक ऑईलचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टँकरने पेट घेतल्याने त्याला भीषण आग लागली. त्यामुळे ब्रीजखालून जाणाऱ्या गाडयावरही ऑईल सांडून गाडयांनी पेट घतला. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर ऑईल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला. तर, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले.
अग्नीशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. त्यातच पाऊस देखील आल्याने आग विझविण्यास मदत झाली. अतिशय भयंकर अशी ही घटना असून संपूर्ण परिसरास आगीचे लोट पहायला मिळत होते. अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.