भंडारा (वृत्तसंस्था) भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी आहे, या आगीची सखोल चौकशी करून दुर्घटनेला जबाबदार असणाऱया दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा रुग्णालयाला भेट देणार असून, घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीमुळे १० नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१० जानेवारी) सकाळी ७.३० वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील. १२.१५ वा. नागपूर विमानतळ येथे आगमन, १२.२० वा. हेलिकॅप्टरने शहापूर, ता.जि भंडाराकडे प्रयाण त्यानंतर १२.५५ वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट, ०१.२० वा जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण, ०२.३० वा विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु:खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
तपासाची माहिती दररोज मुख्यमंत्र्यांना
नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी हे आग कशामुळे लागली या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयातील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण २०१५ मध्ये झाले होते. मात्र त्याचे ऑडीट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयीसंपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल. या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवायचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.