मुंबई (वृत्तसंस्था) ‘आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कोणाला मुद्द्याम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी आरोप असलेले महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषेदत बोलताना भूमिका मांडली. “संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे व या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशीचे आदेश दिले आहेत” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
संजय राठोड यांनी स्वत:हून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.
राज्यातील विरोधी पक्ष दुतोंडी : मुख्यमंत्री
कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक झालं आहे. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
















