ओडिशा (वृत्तसंस्था) ओडिशाच्या ढेंकानालमध्ये जमावाकडून सीबीआय टीमवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सीबीआयची टीम चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापेमारी करण्यासाठी गेली होती. यावेळी संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. अखेर स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची जमावापासून सुटका केली.
चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह १४ राज्यांतील ७७ ठिकाणांवर छापा मारला होता. जालौन, मऊ सारख्या छोट्या जिल्ह्यांसह नोएडा, गाझियाबाद सारख्या मोठ्या शहरांत, नारोर, जयपूर, अजमेर ते तामिळनाडूच्या कोईबतूर शहरांचा या छाप्यात समावेश आहे. सीबीआय टीमने ओडिशाच्या ढेंकनालमध्ये सकाळी ७ वाजता सुरेंद्र नायक याच्या घरी छापा मारला. सीबीआयची टीम दुपारपर्यंत चौकशी करत होती. या दरम्यान कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला. यानंतर स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जमावाच्या तावडीतून सोडविले आहे.
देशातील वाढत्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या मुद्द्यावर सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय मंगळवारी सकाळपासून देशातील ७६ ठिकाणी छापेमारी करत आहे. सीबीआय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी ८३ आरोपींविरुद्ध २३ एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.