जालना (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही यावेली रावसाहेब दानवे यांनी केली. जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचं सांगायला देखील रावसाहेब दानवे विसरले नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात पाहावं लागेल. नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. सरकारने शेतकर्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने काही प्रमाणात माघार घेण्याचे संकेत दिले होते. परंतु शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत नवीन कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत.
भाजपाचे नेते सोडून या देशातील सगळी जनताच पाकिस्तानी आणि चिनी आहे का असा संशय येऊ लागला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे परिस्थिती बिघडू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी आणि ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान कुठे होते ? असा सवालही त्यांनी विचारला.