चोपडा (प्रतिनिधी) चारित्र्यावर संशयातून पतीकडून शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सत्रासेन येथे घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात पती प्रल्हाद सदाशिव जोशी (रा. सत्रासेन ता. चोपडा ह.मु पुणे) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रकाश रामचंद्र जोशी (वय ३४ रा. सत्रासेन ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत उज्वला प्रल्हाद जोशी (वय २६ रा. सत्रासेन ता. चोपडा) हीचे प्रल्हाद जोशी सोबत दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी गंधर्व विवाह झाला होता. गंधर्व विवाह झाल्यानंतर सुमारे १० ते १५ दिवसांनी पती प्रल्हाद हा पत्नी उज्वलाच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी चापटा बुक्यांनी व लाथांनी मारहाण करीत होता. त्यांनतर पुणे येथे गेल्यावर सुध्दा पती प्रल्हाद हा पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी शिवीगाळ व चापटा बुक्यांनी व लाथांनी मारहाण करीत होता. शेवटी पतीच्या या त्रासाला कंटाळुन विवाहिते २१ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी लासुर (ता. चोपडा) गावच्या शिवारात सत्रासेनकडेस जाणाऱ्या नाल्या जवळील बखळ जागेत गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.