चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा येथे श्री विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्यावरुन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उफाळलेल्या वादातून पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.
धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे हे गावात पोहचले. आता १० वाजल्याने वाजंत्री बंद करण्याचे आदेश त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिेले. यावरुन पदाधिकारी व अधिकारी यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने पोलिसांनी थेट लाठीमार सुरु केला. अचानक हा प्रकार घडल्याने मिरवणुकीसाठी आलेले लोक पळू लागले. यानंतर काही वेळात दगडफेकही सुरु झाली. यात दोन चारचाकी वाहनांच्या काचा फुटल्या. गावात रात्री उशिरापर्यंत दोन मंडळाचे श्री विसर्जन थांबविण्यात आले होते.
दरम्यान, दि ४ रोजी दुपारी गणेश विसर्जन सुरु झाल्यानंतर पोलिसांनी पाच तरुणांनी किरकोळ कारणांवरुन पोलिस गाडीत बसवून ठेवले होते. येथूनच तणाव सुरु झाला होता. पुढे रात्री दहा वाजता मिरवणुक ही मशिद जवळुन जात असतांना दोन मंडळ पार झाली होती. तिसरे मंडळ ओम गणेश मंडळ जात असतांना वाजंत्री अचानक बंद करण्याची सूचना करण्यात आली. परंतू काही गणेशमंडळांनी जागेवरच ठिय्या मांडला. यानंतर संपूर्ण वाद उसळला. काही टारगट पोरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही कळते.