चोपडा (प्रतिनिधी) धनादेश अनादरप्रकरणी अमळनेर न्यायालयाने एकाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
अमळनेर येथील श्रीराम कॉलनीतील संशयित राकेश सुरेश पाटील यांनी चोपडा पाटील गढी येथील रहिवासी, फिर्यादी तथा पंचायत समितीचे निवृत्त कर्मचारी हेमंतकुमार भागवतराव देशमुख यांच्याकडून सन २०११मध्ये हॉटेल व्यवसायासाठी हात उसनवार म्हणून रुपये १ लाख ७० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात राकेश पाटील याने देशमुख यांना ३० ऑगस्ट २०१२मध्ये धनादेश दिला होता. हा धनादेश न वटता परत आल्याने देशमुख यांनी अमळनेर न्यायालयात ३५/२०१३नुसार राकेश पाटील याच्या विरूद्ध निगोशिएबल इन्स्ट्युमेंट अॅक्ट कलम १३८ नुसार खटला दाखल केला होता.
या खटल्याचा निकाल न्या. एन. आर. येलमाने यांनी नुकताच दिला. यात राकेश पाटील याला सहा महिने साधी कैद व २ लाख ८९ हजार रुपये देशमुख यांना द्यावेत, असा आदेश दिला आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. प्रशांत बडगुजर यांनी काम पाहिले.