धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात चोर आणि पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार रंगल्याची खळबळजनक घटना दि.२३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री घडली. चोरटे पुढे तर पोलीस मागे असा वेगवान थरार चोपडा-धरणगाव रोडवर मध्यरात्री साधारण पंधरा ते वीस मिनिट सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून एका चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात डीझेल चोरी करणारी ही टोळी असून त्यांनी अनेक गुन्हे केले असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे धरणगावात चोरीचा फसला आहे. (Thief-Police-Chase-Thriller-In-Dharangaon)
नेमकं काय घडलं !
शिवेंद्रसिंग आदिराम धाकर (वय-२९ वर्ष, व्यवसाय- वाहन चालक, रा. रानीपुरा ता. जौरा जि. मुरेना (मध्य प्रदेश) हे त्यांची बलकर गाडी क्र. (NL ०१ AF ९८३०) ही धरणगाव-चोपडा रोडवरील आयटीआय जवळ रोडाच्या खाली गाडी उभी करुन त्यात झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांना गाडी जवळ आवाज आल्याने त्यांनी खाली उतरुन बघायला जाताच गुरु उर्फ प्रशांत नवनाथ देवकाते याने धाकर ड्रायव्हर यांच्या गळ्यास धारदार चाकू लावत गळा कापण्याची धमकी दिली. याचवेळी योगेश धनगर, शुभम अविनाश शेळके आणि गोपाळ पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा. रामनगर धुळे) हे बलकर गाडीच्या डिझेल टाकीचे झाकन तोडून सुमारे १२० लिटर डिझेल जबरीने काढून घेतले.
पोलिसांना बघताच चोरांनी काढला पळ !
याचवेळी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे आपल्या सहकारी नितीन चौधरीसह रात्रीच्या गस्तीवर होते. पो.नि. ढमाले यांना कार ओळखीची वाटल्यामुळे त्यांनी चालक चौधरी यांना पोलीस वाहन कारच्या समोर लावायच्या सूचना केल्या. पोलीस वाहन आपल्या दिशेने येत असल्याचे बघताच चोरटे घाईघाईने कारमध्ये बसून चोपड्याच्या दिशेने सूसाट निघाले. पो.नि. ढमाले यांनी देखील चालक चौधरी यांच्यासह कारचा पाठलाग करायला सुरुवात केली. पो.नि. ढमाले यांनी तेवढ्यात रोटवदचे पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती देत पोलीस वाहनाच्या मागे येण्याच्या सूचना केल्यात.
…आणि मग पाठलागचा सिनेस्टाईल थरार झाला सुरु !
मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास चोर-पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार सुरु झाला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मार्ग बदलत दिशाभूल करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु पोलीस मागे हटलेच नाही. नांदेड फाटा आल्यावर चोरट्यांना कळून चुकले की, आपण कारने कितीही पळ काढला तरी पोलीस आपला पिच्छा सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी कार तिथंच सोडून शेतातून पळ काढायला सुरुवात केली. पो.नि. ढमाले यांना कळून चुकले होते की, ही सराईत गुन्हेगारांची टोळी आहे. त्यांच्याकडे हत्यार आहेत. त्यामुळे त्यांनी वाहनातून उतरताच सापळे पिस्तुल काढत आपले सहकारी नरेंद्र चौधरी यांच्यासह पाठलाग सुरु केला.
नरेंद्र चौधरींनी मोठ्या हिंमतीने पकडले चोराला !
पो.नि. ढमाले यांना आणि पोलीस कर्मचारी नरेंद्र चौधरी हे वेगवेगळ्या दिशेने चोरांचा पाठलाग करत होते. थोडावेळ पाठलाग केल्यानंतर गुरु उर्फ प्रशांत हा त्यांच्या टप्प्यात आला. पोलीस आपल्या जवळ आल्याचे लक्षात येताच गुरुने चाकू काढून चौधरी यांना मारण्याची धमकी दिली. परंतू पोलीस कर्मचारी चौधरी यांनी न भिता मोठ्या हिंमतीने चोरासोबत दोन हात करत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न असफल तर झालाच. परंतू डीझेल चोरणारी एक मोठी टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे.
पो.नि. उद्धव ढमाले आणि पोलीस कर्मचारी नरेंद्र चौधरी यांच्या धाडसाचे होतेय कौतुक !
पो.नि. उद्धव ढमाले आणि पोलीस कर्मचारी नरेंद्र चौधरी यांच्या धाडसाचे धरणगावकर कौतुक करत आहेत. पो.नि ढमाले यांनी देखील पोलीस कर्मचारी नरेंद्र चौधरीचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणी चालक शिवेंद्रसिंग धाकर ह्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि.जिभाऊ पाटील हे करीत आहेत. दरम्यान, अटकेतील चोरट्याने धरणगावसह पारोळा, चोपडा, अमळनेरसह इतर ठिकाणी देखील चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कार जप्त करून ठाण्यात आणली आहे.