जळगाव, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी) : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात यांनी आपली उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजयी घौडदौड केली. या स्पर्धेत सहभागी संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित आमचे मन जिंकले.
सीआयएससीई कौंन्सिलचे सहसचिव अर्जित बसू यांच्याहस्ते पहिल्या सलामिच्या मॅचसाठी टॉस करण्यात येऊन सामन्यास सुरवात झाली. अन्य संघाच्या खेळासाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगावचे रविंद्र नाईक, शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू योगेश घोंगडे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे यांच्या हस्ते नाणेफेक झाली.
महाराष्ट्रने वेस्ट बंगालवर ३-० असा दणदणीत विजय मिळवत आपली आघाडी भक्कम केली. सांघिक समन्वय आणि आक्रमक रणनीतीच्या जोरावर महाराष्ट्रच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. दुसरीकडे, पंजाबने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी तामिळनाडूला ४-० आणि बिहारला ५-० अशा मोठ्या फरकाने पराभूत करत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. पंजाबच्या खेळाडूंनी गोलपोस्ट वर सातत्याने केलेल्या आक्रमणाने प्रतिस्पर्धी संघांना उसंत मिळू दिली नाही.
गुजरातने देखील आपली छाप पाडली. त्यांनी बिहार आणि तेलंगानावर अनुक्रमे ५-० अशा दमदार विजयासह आपली विजयी लय कायम ठेवली. कर्नाटकाने उत्तर प्रदेशला ४-० ने मात देत आपली ताकद दाखवली, तर वेस्ट बंगालने उत्तर प्रदेशवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. तामिळनाडूने तेलंगानावर २-० असा विजय संपादन करत स्पर्धेतील आपले स्थान भरंभक्कम केले.
स्पर्धेचे आयोजन अत्यंत उत्कृष्टरीत्या केले आहे. स्पर्धा आयुक्त ललिता सावंत, सिद्धार्थ किल्लोस्कर (सीआयएससीई कौंन्सिलचे स्कूल मुंबई विभागाचे समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती शाळेचे विक्रांत जाधव, तसेच प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे आणि वरूण देशपांडे यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. अनुभूती स्कूलच्या मैदानावरील व्यवस्था, खेळाडूंची सुरक्षितता आणि सामन्यांचे वेळापत्रक यामुळे आयोजकांचे कौतुक आहे.
११ जुलैचे नियोजित सामने
उद्या, ११ जुलै रोजी, स्पर्धेत काही चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. पंजाब विरुद्ध गुजरात, महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश, कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र आणि तामिळनाडू विरुद्ध गुजरात असे सामने रंगणार आहेत. या सामन्यांमध्ये खेळाडूंची कामगिरी आणि रणनीती यावर सर्वांचे लक्ष असेल. ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरत आहे.