बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचखेड सिम गावात मोबाइलमध्ये फोटो काढण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रारी दिल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हाणामारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास झाली.
या बाबत येथील योगेश पाटील यांनी तक्रार दिली की, गावात मरी माता मंदिरासमोर सप्ताहाचे कार्यक्रम सुरू आहे. शेतात जात असताना त्या ठिकाणी भांडण सुरू असल्याचे दिसले. मी थांबून विचारपूस करत असताना निवृत्ती पाटील, सुनील इंगळे हे मोबाईलवर फोटो काढत असल्यासचे प्रकाश पाटील यांनी सांगितले. मी त्यांना विनाकारणचे फोटो का काढताय?, असे विचारले असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली व गोपाळ पाटील अमोल इंगळे देविदास इंगळे यांनी काठया, कुऱ्हाड, चाकू,विळा घेऊन हल्ला केला. तसेच भांडण सोडवणाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. त्यात देविदास पाटील गोपाळ पाटील लीना पाटील, अतुल पाटील, शुभम पाटील यांना दुखापत झाली. योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवृत्ती पाटील, गोपाळ पाटील, सुनील इंगळे, अमोल इंगळे, देविदास इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या पक्षाकडून गोपाळ पाटील यांनी फिर्याद दिली की, निवृत्ती पाटील, रवींद्र इंगळे यांना काठ्या,हातोडी घेऊन गणेश पाटील, अतुल पाटील, प्रदीप पाटील, संदेश पाटील ,निना पाटील ,आकाश पाटील ,शिवम पाटील ,सागर पाटील ,भास्कर पाटील ,गोपाळ पाटील, प्रकाश पाटील यांनी मारहाण केली. त्यामुळे या लोकांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.हे.कॉ. अयुब तडवी पुढील तपास करीत आहेत.