धरणगाव (प्रतिनिधी) दुकानातील गिऱ्हाईकाच्या वादातून शहरातील आठवडे बाजार परिसरात हाणामारी झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पहिली फिर्याद किशोर महाजन यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे बंधू विजय महाजन यांनी गिऱ्हाईकाला विचारले की, तुम्ही आमच्या दुकानातून माल घेण्याचे ठरविले होते, मग दुसऱ्याच्या दुकानातून का घेतला?, असे विचारल्याचा राग आल्याने दुसरे दुकानदार अविनाश संजय चौधरी (२६) याने किशोर महाजन व विजय महाजन यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तर विजय यास गिरीश चौधरी (२४) तसेच गणेश चौधरी (४३) यांनी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी अविनाश चौधरी (२६), संजय चौधरी (५५), निखिल चौधरी (२५), गिरीश चौधरी (२४), गणेश चौधरी (४३), रुपेश चौधरी (२१), हर्शल चौधरी,विलास चौधरी, गोपाल पाटील यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.
या प्रकरणी दुसरी फिर्याद गणेश चौधरी यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की,त्यांचा भाचा निखील चौधरी यांच्या दुकानातून गिऱ्हाईकांने माल घेतल्याचा राग आल्याने संशयितांनी गैरकायद्याची गर्दी जमवून भाच्याच्या दुकानाची तोडफोड केली. तसेच धनराज महाजन, किशोर महाजन आणि दिलीप महाजन यांनी गणेश चौधरी यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी धनराज मांगो महाजन, किशोर मांगो महाजन, दिलीप मांगो महाजन, अनिल मांगो महाजन, राजू मांगो महाजन, गणेश मांगो महाजन, सुमित महाजन, मांगो महाजन व इतर सात ते आठ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.