सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) आज सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी सर्वात महत्त्वाचे वृत्त म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांची खुर्ची एकमेकांच्या आजुबाजुला असणार अशा चर्चा आहेत. यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांसोबत संवाद साधणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, नारायण राणे चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिलाय. व्यासपीठावरील परिस्थिती काय असेल, त्यावर आपलं भाषण अवलंबून असेल, अशा आशयाचं वक्तव्य राणेंनी केलंय. त्याचवेळी उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, याकडेही राणेंचं लक्ष वेधण्यात आलं. ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का? असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असं सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे जरी एकाच व्यासपीठावर बसलेले पाहायला मिळाले तरी तुम्ही तिकडे, आम्ही इकडे अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.