मुंबई (वृत्तसंस्था) आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री work From Home करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा”, अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून आता लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईकरांना कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेन हा स्वस्त आणि वेळ वाचवणारा असा पर्याय आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांसोबतच सामान्य नागरिकही करत आहेत. आता भाजपने सुद्धा तातडीने निर्बंध शिथील करुन लोकल प्रवासाची सर्वांना परवानगी देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आज उद्धव ठाकरेजी, मंत्रिमंडळाची बैठक आहे, आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथिल करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा”, अशी मागणी उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत केली आहे.
“मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळां सुरु नसल्याने वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा”, अशी मागणी उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.