पुणे (वृत्तसंस्था) लाल महालात लावणी नृत्य सादर करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी वैष्णवी पाटीलसह चौघांविरोधात फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.
लाल महालात रिल्ससाठी लावणी नृत्य शूट झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. तसंच ब्रिगेडने या शूटवर आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेडने याबाबतची तक्रार पोलीस आयुक्तांसह महानगर पालिका आयुक्तांकडे केली होती. लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपट आणि तमाशातील गाण्यांवरती नृत्य करत या ठिकाणी रिल्स शूट केल्या जात आहेत.
या ठिकाणी असे नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे असून वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी शूट केलं. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यानंतर वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.