जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचे अधिक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात कारागृहात असणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सुमारे सात हजार वीज जोडण्या तोडण्यात आल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्यांसह जळगाव वीज परिमंडळाच्या कार्यालयात धडक दिली होती. येथे अधिक्षक अभियंता फारूक शेख यांना दोराने बांधून बांधावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच परिमंडळ कार्यालयास कुलूप ठोकले होते. यामुळे मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियंता फारूक शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पहिल्यांदा पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावर काल सुनावणी पूर्ण झाली होती. तर आज न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.