धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कडक निर्बंध जरी केलेले असताना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आ. चव्हाण यांनी कोरोना काळात शासनाच्या ‘ब्रेक दि चैन’ या संकल्पनेचा फज्जा उडवत जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आ. चव्हाण यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेने केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह याबाबतचे निवेदन दिले.
शिवसेनेने निवेदनात म्हंटले आहे की, दि. २६ मार्च २०२१ रोजी विज महावितरण कंपनीच्या अधिकारी शेख यांना त्यांच्या खुर्चीला दोरीने बांधून ठेवल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती व आहे. याप्रकरणी MIDC पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांचेसह सर्व ३१ शेतकऱ्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींची जळगावातील कारागृहात रवानगी केली होती.
दरम्यानच्या या काळात आरोपींच्या वकीलांनी आरोपींना जामीन मिळावा म्हणून त्यांच्यावतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. जळगाव येथील न्यायालयाने तब्बल १२ दिवसांनी सर्व आरोपींना जामीन मंजूर करून त्यांची जळगाव कारागृहातून जामीनावर मुक्तता केली.
तसेच सध्या कोरोना काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व संपूर्ण जिल्ह्यात कोरोना सारख्या महामारीचा संसर्ग टाळता यावा. या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दि. ५ एप्रिल २०२१ ते दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत आदेश जारी केलेले असताना आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांचे सर्व समर्थकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याचे आदेशाला केराची टोपली दाखवून, कोरोना काळात शासनाचे ‘ब्रेक दि चैन’ या संकल्पनेचा फज्जा उडवत जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करीत, कोरोनाशी संबंधित सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिस यंत्रणेला थेट आव्हान देत पोलीस म्हणजे गणवेशातील सरकारच” या गोष्टींचे भान विसरून पोलिसांच्या नाकावर टिच्चुन कायदा व सुव्यवस्था धिंदवडे काढून चाळीसगाव येथे त्यांचे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत ढोल-ताशाच्या तसेच डीजेवर बंदी असताना देखील वाजंत्रीच्या गर्जरात जंगी मिरवणूक/रॅली काढून तसेच मायबाप सरकारच्या निषेधार्थ बहाळ येथील श्रीक्षेत्र ऋषीपाथा येथे मुंडण करून एक प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याचे अघोरी कृत्य केल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.
या रॅली दरम्यान शेकडो गाड्यांचे ताब्यात आमदार मंगेश चव्हाण समर्थकांनी वाहतुकीचा अडथळा निर्माण केलेला दिसून येत आहे. तसेच रॅलीमध्ये खुद्द आमदारांचा अनेक समर्थक विना मास वावरत असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने जनु आमदारासह त्यांच्या समर्थकानी कोरोनाला प्रत्यक्ष आमंत्रणच दिल्याचे दिसून येत आहे. जेव्हा की नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मास्क म्हणजे एक प्रकारे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षा कवचसारखेच असल्याचे मत नोंदविले असताना आमदार व त्यांचे समर्थकांनी विनामास्क वावरुन एक प्रकारचे दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश देखील पायमल्ली (Contempt of Court) केल्याचे दिसून येत आहे.
तसेच आमदार मंगेश चव्हाणसह सर्व आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. त्या अटी-शर्तीमधील एक अट म्हणजे आरोपी साक्षीदारांवर कुठल्याही प्रकारे दबाव आणणार नाही. असे असून देखील आमदारांनी व त्यांचे समर्थकांनी भव्य दिव्य व जंगी रॅली काढून एक प्रकारे शक्तिप्रदर्शन साक्षीदारांवर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अटी शर्ती देखील भंग (Break on Condition) केल्याचे दिसून येत आहे.
आमदार गंगेश चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी जंगी रॅली बघून पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे व शरद मोहोळ यांची जंगी रॅलीचे आठवण झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा जनमाणसात असल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करून तसेच सदर घटनेचा सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांचे सर्व समर्थकांवर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाहीचा फास आवळावा व सर्व सामान्य जनतेत कायदा पालनाचा एक चांगला संदेश पोहचवावा व जनसामान्य कायद्याविषयी, प्रशासनाविषयी व पोलिसांविषयी आदरयुक्त भीती निर्माण करावी. अशी मागणी
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ, बालूसाहेब जाधव, युवासेना शहरप्रमुख संतोष महाजन, कमलेश बोरसे हे उपस्थित होते.