बोदवड (प्रतिनिधी) बोदवड ते मलकापूर रस्त्यावरील वरखेड खुर्द गावाजवळ कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मदतीसाठी रवाना करत जखमींना रुग्णालयात पोहचवत वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून दिली.
याबाबत माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील रोहन केशव भोम्बे (वय२८) व सोमनाथ भोम्बे (वय २०) हे (एम एच२० सी. जि.५८७३) या मोटार सायकलने बोदवडकडे होते. यावेळी मलकापूरकडे जाणार मारूती वैगनआर (क्र.एम एच १२ इ टी २८७७) ला समोरासमोर धडक बसल्याने मोटारसायकल वरील दोघेही युवक गंभीर जखमी झाले. या अपघाताबाबत वरखेड येथील शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. आमदारांनी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्याशी संपर्क साधून अपघात ग्रस्तांना मदत करण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार नगराध्यक्ष पाटील यांनी तात्काळ गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, कलीम शेख यांना सोबत घेऊन नगरपंचायतच्या रुग्णवाहिकेने बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जखमींना आणले. या जखमींना गंभीर दुखापती झालेल्या असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ मोठया रुग्णालयात नेणे गरजेचे आहे, असे बोदवडच्या वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, जखमी युवकांच्या नातेवाईकांशी शिवसैनिकांनी जखमी तरुणांच्या मोबाइलवरून संपर्क साधत नातलगांनी दोघेही जखमींना बुलढाणा येथे पोहचून देण्याची विनंती केली. त्यानुसार शिवसैनिक हर्षल बडगुजर ,गोलू बरडीया, राहुल घाटे यांनी जखमींना बुलढाणा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे पोहचवले. त्यापैकी रोहन भोम्बे याचा हात व पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे व डोक्याला थोडा मार लागल्याने याच्यावर बुलढाणा येथे उपचार सुरु असून सोमनाथ भोम्बे यास डोक्यास गंभीर मार असल्याने त्यास नातलगांनी पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे दाखल केले. अपघातग्रस्त युवकांना तात्काळ मदत करत नातलगापर्यंत पोहचवले. याबद्दल नातलगांनी शिवसैनिकांचे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. सदर अपघात बाबत जखमी युवक जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.