भुसावळ (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र कीन्ही येथील आरोग्य विभागाकडून सुरू असलेली लसीकरण मोहीम लोकसहभागाच्या नियोजनामुळे यशस्वी झाली आहे. त्यामुळेच ग्रामीण नागरिकांमध्ये समाधान असून भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कीन्हीला आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली.
ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि युवा पिढी जातीने लसीकरण केंद्रातलक्ष देत असून योग्य प्रकारे लसीकरण होत असून कुठल्याही प्रकारे गर्दी दिसून येत नाही. असाच अनुभव कठोरा प्राथमिक केंद्रात देखील आला. तालुक्यातील बहुतांशी जनतेकडे स्मार्ट फोन नाहीत, त्यातही नेटवर्क योग्य मिळत नाही, वयोवृद्ध नागरिकांना स्मार्ट फोन व्यवस्थित चालवता येत नाही, कधी कधी सर्वर प्रतिसाद देत नाही, अश्या विविध समस्या खेड्यापाड्यात येत असून नागरिकांनी या सर्व समस्या आ. संजय सावकारे यांच्याकडे मांडल्या.
ग्रामीण भागातील या बाबींचा फायदा घेत शहरातील नागरिक ऑनलाईन लस बुकिंग करून गावात येतात आणि लस घेतात, यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाला ताटकळत राहावे लागते. कारण टोकन नंबर दिला गेला असतो. यामुळे ग्रामीण जनता लसीकरणापासून वंचित राहते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. कल्पना दवंगे, जनसेवक सचिन (बंटी) सोनवणे, उपसरपंच जयंत पाटील, सदस्य दिलिप सुरवाडे, पोलिस पाटील राजेंद्र तायडे, भुसावळ तालुका ग्रामीण सोशल मिडीया प्रमुख सचिन येवले आदी उपस्थित होते.
लसीकरण आँफलाइन पद्धतीने करावे
ग्रामीण भागातील नेटवर्कचा विचार करता, ही पद्धत ग्रामीण नागरिकांच्या मुळावर आली आहे. त्यामुळे हा त्रास जनतेला न देता सर्वांना ओळीने लसीकरण करावे. सदर लसीकरण आँफलाइन पद्धतीने करावे, म्ह्णून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती आ. संजय सावकारे यांनी दिली.