नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत असून नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ८ हजार ८६५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १९७ कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. तर देशात ११,९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ८८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, सोमवारी १०,२२९ कोरोना रुग्ण आढळले होते. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १,३०,७९३ वर आली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ११,९७१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील दैनंदिन संसर्ग दर ०.८० टक्क्यांवर घसरला आहे, जो गेल्या ४३ दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. तसेच साप्ताहिक संसर्ग दर ०.९७ टक्के आहे, जो ५३ दिवसांपासून दोन टक्क्यांवरून खाली आला आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३ कोटी ४४ लाख ५६ हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी चार लाख ६३ हजार ८५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ६१ हजार लोक बरे झाले आहेत. देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १.५ लाखांवर आली आहे. एकूण १ लाख ३० हजार ७९३ जणांवर उपचार सुरू आहेत.
१६ नोव्हेंबरपर्यंत देशभरात कोरोना लसीचे ११२ कोटी ९७ लाख ८४ हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ५९.७५ लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, आतापर्यंत सुमारे ६२.५७ कोटी करोना चाचण्या झाल्या आहेत. तर सोमवारी सुमारे ११.०७ लाख कोरोना नमुना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील स्थिती
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (सोमवारी) ६८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ६८ हजार ७९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के आहे. राज्यात काल (सोमवारी) १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ९९,८५९ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १०१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४०,५२,२१९ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.