चाळीसगाव (प्रतिनिधी) कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवारी सायंकाळी दिव्यांच्या रोषनाईत, फटाक्यांच्या आतषबाजीत न्हाऊन निघालेल्या अल्हाददायक वातावरणात चाळीसगाव शहरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तर शहरासाठी पुढील ३० वर्षाचे नियोजन लक्षात घेऊन १४२ कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संपन्न झाले, यावेळी स्केटींग खेळणा-या मुलांच्या हस्ते उद्यानात साकारलेल्या स्केटिंग ग्राउंडचे उद्घाटन देखील करण्यात आले. नुकतेच केबीसी मध्ये सहभागी होत चाळीसगावचे नाव बिग बी अमिताभजी यांच्या ओठी आणणारी कु. श्रद्धा किशोर कापुरे हिचा व तिच्या आईवडिलांचा आमदार चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.सुनील राजपूत, डॉ.विनोद कोतकर, मार्केट सभापती प्रदीप पाटील, उपसभापती शैलेंद्र पाटील, पोपट भोळे, मच्छिंद्र राठोड, बाबूलाल पवार गुरुजी, रवींद्र पाटील, योगेश अग्रवाल, देवयानीताई ठाकरे, सुरेश स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, के.बी. साळुंखे, प्रितमदास रावलानी, वसंत चंद्रात्रे, शेषराव पाटील, कपील पाटील, राजेंद्र राठोड, दिनेश माळी, प्रदीप देवरे, डॉ. महेंद्र राठोड, विष्णू चकोर, प्रा. सुनील निकम, नमोताई राठोड, संगीता गवळी, अलकनंदा भवर, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, सुभाष पाटील, नवल पवार, साहेबराव राठोड, धर्मराज अहिरराव यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदि उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष नितिन पाटील यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव शहरासाठी सुधारीत पाणी पुरवठा योजनेमुळे प्रतिव्यक्ति १३५ लिटर पाणी देणे शक्य होणार आहे. या योजनेतर्गंत शहरात नविन चार जलकुंभ उभारले जाणार आहे. सुवर्णा स्मृती उद्यानातही अद्यावत सुविधा साकारण्यात आल्या असून यामुळे चाळीसगाव शहराचे सौंदर्यात मानाचा मोरपीस खोवला गेला आहे. दर्शनीभागात कटेवर हात ठेवलेली श्री विठ्ठलाची मूर्ती व उद्यानात ध्यानस्थ श्री शंकर भगवान हे खऱ्या अर्थाने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थाचे प्रतिक असून आमदार मंगेश चव्हाण यांनी उद्यानाच्या माध्यमातून चाळीसगावकरांसाठी आरोग्य पंढरी उभारली आहे असा सूरही यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. यावेळी श्रद्धा किशोर कापुरे हिचा सत्कार करण्यात आला. आभार योगेश खंडेलवाल यांनी मानले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सद्यस्थितीत असलेली पाणीपुरवठा योजना हि वारंवार गळती होत असल्याने पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही. त्यामुळे पाणी असूनही शहराला ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. चाळीसगाव शहरासाठी सुधारीत पाणी पुरवठा योजनेमुळे दररोज प्रतिव्यक्ति १३५ लिटर पाणी देणे शक्य होणार आहे. या योजनेतर्गंत शहरात नविन चार जलकुंभ उभारले जाणार आहे. सुवर्णा स्मृती उद्यानातही अद्यावत सुविधा साकारण्यात आल्या असून यामुळे चाळीसगाव शहराचे सौंदयात मानाचा मोरपीस खोवला गेला आहे.
चाळीसगाव शहर व तालुक्यालाही विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध असून येत्या चार वर्षात एक हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली जाईल. ७५ एकर परिसरात तांत्रिक, कृषी महाविद्यालयांसोबत औद्योगिक वसाहतीत हजारो कोटी रुपयांच्या उद्योगाची मुहूर्तमेढ करणार आहोत. चाळीसगावकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील कुण्याही माणसाला चाळीसगावचा हेवा वाटेल, अशी जडण – घडण केली जाईल. बसस्थानक देखील नव्याने करण्याचे काम हाती घेतले आहे. धुळे रोड परिसरात देखील नमो उद्यानाचा लवकरचं कुदळ मारला जाईल असे उपस्थित चाळीसगावकरांना आश्वासित केले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. विरोधक कुठला तरी मुद्दा पुढे करुन जुमलेबाजी करतील. राजकारणात पोपटपंची व भावनांची पेरणी करुन चालत नाही. राजकारण हे विकास केंद्री असले पाहिजे. गेल्या सहा वर्षात याचं प्रांजळ उद्देशातून काम करीत आहे. त्यामुळे चाळीसगावच्या जनतेने देखील विकासाच्या प्रवाहासोबत राहिले पाहिजे. कुणी जर चाळीसगावकरांच्या हितासाठी हजारो कोटी रुपयांची कामे करण्याचे अश्वासन जाहीररित्या देत असेल तर आपण त्याच्यासोबत काम करु. मात्र भावनेवर स्वार होऊन राजकारण केले जाऊ नये, शहराच्या भावी पिढ्यांसाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चाळीसगावकर आपला भरभरून आशिर्वाद देतील हा मला विश्वास आहे.
सदर लोकार्पण झालेल्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे काम पूर्ण होण्याच्या मुदतीच्या ६ महिने आधीच चाळीसगाव करांच्या सेवेत दाखल झाले असून या उद्यानात जागतिक दर्जाचे साहित्य वापरलेले गेले आहे.
- उद्यानातील वैशिष्ट्ये —
८११ मीटर जॉगिंग ट्रॅक – ३११ मीटर आकर्षक ग्रेनाइट कॉबेल स्टोन आणि ५०० मीटर नैसर्गिक रेड क्ले ब्रिक्स, डेकोरेटिव स्ट्रीट लाइट्स व स्पीकर प्रणालीसह
अम्फीथिएटर आणि शिल्पकला क्षेत्र – प्रसिद्ध आग्रा स्टोन (लाल दगड) वापरून बांधकाम, जिथे Sir J.J. School of Art, मुंबई येथील तज्ञ कलाकारांनी शिल्पे साकारली आहेत
Kids Play Zone – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा किड्स प्ले एरिया जिथे जगातील सर्वोत्तम Miroad Rubber Industries कडून आयात केलेले EPDM Flooring आणून बसवली आहे लहान मुलांच्या सुरक्षिताते साठी
ओपन ऑडिटोरियम – १००० आसन क्षमतेचे, जगप्रसिद्ध Serge Ferrari (France) यांच्या Tensile Roofing सह
स्वतंत्र महिला आणि पुरुष ग्रीन जिम – खुल्या हवेत व्यायामासाठी सुरक्षित आणि आधुनिक व्यवस्था
महाराष्ट्रातील पहिले शासकीय मान्यताप्राप्त Roller Hockey Ground
बास्केटबॉल आणि टेनिस कोर्ट्स – उच्च गुणवत्ता पॉलीयुरेथेन फ्लोरिंगसह
योग आणि ध्यान झोन – शांत, हिरवळीत विसाव्याची जागा
शहीद स्मारक – आपल्या वीरांना अर्पण केलेले प्रेरणास्थान
१०० बांबूची पक्षीघरटी – चिमण्या व विविध पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवासस्थाने
रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर लाइट्स, कंपोस्ट युनिट – पर्यावरणपूरक उपक्रम
















