बोदवड : बोदवड तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या संततधार पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. या नुकसानीची पाहणी करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी बोदवड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बोदवड तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून परतीचा संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबीन पिकाला कोंब फुटून ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यातच सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असून जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने कपाशीवर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची पाने लाल – पिवळी होऊन पानगळ झाली आहे. त्यामुळे कपाशीची जेमतेम एक वेचणी होऊन अजून कापूस उमलण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे, कीटकनाशके फवारणी, रासायनिक खतांसाठी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. मागील काळात यावेळेप्रमाणे कापूस पिकाचे लाल्या रोगाने नुकसान झाले होते. त्यावेळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाचे अनुदान मिळाले होते. तरी यावेळी सुद्धा लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सरसकट लाल्या रोगाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष आबा पाटिल, माजी सभापती गणेश पाटिल, भरत अप्पा पाटिल, दिपक वाणी, किरण वंजारी, विजय चौधरी, वामन ताठे, अक्षय चौधरी, प्रदिप बडगुजर, सतिष पाटिल, निलेश पाटिल, कविता गायकवाड, वंदना पाटिल, हकीम बागवान, विशाल पाटिल, शुभम माळी, नईम खान, मयुर खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.