अहमदनगर (वृत्तसंस्था) पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली. रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव रचला होता. परंतू हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ रोहित मडके (रा. फक्राबाद, ता. जामखेड), यांच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी पती तिसऱ्या लग्न करण्यासाठी आग्रही होता, त्यातून हे हत्याकांड झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
कापडामध्ये बांधून मृतदेह बंगल्याच्या मागील खड्ड्यात पुरला !
ज्ञानदेव आमटे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याच्या मयत पत्नी रुपालीला होती. याबाबत तिने पतीला विचारणा केली. याचा राग येऊन आरोपीने दि. १० नोव्हेंबर रोजी घराच्या शेजारी मोठा खड्डा तयार करून पत्नीची क्रूर हत्या केली व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने आरोपीने पत्नीचा मृतदेह कापडामध्ये बांधून बंगल्याच्या मागील बाजूला आगोदरच खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकला.
हरविल्याची खोटी तक्रार दिली !
आपण केलेले कत्य कोणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी आरोपीने त्याच्या मयत पत्नीला श्रीगोंदा येथे पार्लरसाठी नेऊन सोडले आणि त्यानंतर ती घरी माघारी आली नसल्याचे तिच्या माहेरच्यांना सांगत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हरविल्याची खोटी तक्रार दिली. तसेच मयत महिलेच्या भावाला सोबत घेऊन परिसरात शोध घेतला. महिला मिळून न आल्याने मयत महिलेच्या भावाला तिच्या पतीवर संशय आल्याने त्याने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी आणि त्याची पत्नी हे दोघेही श्रीगोंदा येथे गेले नसल्याचे लक्षात येताच त्याने आरोपीच्या घराच्या परिसरात शोध घेतला, तेथे नुकताच बुजविलेला खड्डा उकराला असता, घाण वास आल्याने पोलिसांना माहिती दिली.
खड्डा उकरताच मृतदेह आढळून आला !
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी जाऊन पंचासह पाहणी करत बंगल्याच्या मागील खड्डा उकरला असता, कपड्यात बांधलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. यावरून सदर महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने मोबाईल बंद करून पलायन केले. दरम्यान, ज्ञानदेव आमटे याचा पहिल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर त्याने फकराबाद येथील मामाची मुलगी रूपाली हिच्याशी दुसरा विवाह केला. तिला दोन आपत्य आहेत. त्यानंतर गावातीलच एका मुलीशी त्याचे सूत जुळले. हे प्रकरण रूपालीला समजल्यावर तिने याला विरोध केला. परंतु मी त्याच मुलीशी लग्न करणार असे सांगत असल्याने रूपाली आणि तिचा पती ज्ञानदेव यांचे वारंवार भांडण होत होते.
पतीने मोबाइल बंद करून केले पलायन !
विवाहिता मिळून न आल्याने तिच्या भावाला पतीवरच संशय आला. तिच्या भावाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या दिवशी आरोपी ज्ञानदेव व त्याची पत्नी हे दोघेही श्रीगोंदा येथे गेले नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने आरोपीच्या घराच्या परिसरात शोध घेतला. तेथे एक नुकताच बुजलेला खड्डा दिसला. तो खड्डा त्याने उकरला. त्यातून उग्र वास आला. त्यामुळे त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत खड्डा उकरला. त्यात कपड्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याने मयत महिला ही हरवली नसून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपी पतीने मोबाइल बंद करून पलायन केले. आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आले आहेत.