मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राजकारण तापले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरील तक्रार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समोर आणली आहे. तीन वर्षांपासून तक्रार दाखल असूनही त्यांच्यावर ईडीने कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. अॅक्सीस बँकप्रकरणाची तक्रार ईडीकडे 3 वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. पण, अद्यापही दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे. ‘4 सप्टेंबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी अॅक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?’, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
राजीनामा घेणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.