मुंबई (वृत्तसंस्था) धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या संदर्भात आणखीही काही राजकीय नेत्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली आहे. मुंडे यांनी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता रेणू शर्मा या आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही तक्रार नोंदवली आहे. त्यापाठोपाठ मनसे नेते मनीष धुरी यांनीही एक जबरदस्त खुलासा केला आहे.
“मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले “मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते,” असेही कृष्णा हेगडे म्हणाले. “मी रेणुला दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करून रिलेशनशिपबाबत विचार असे, असा आरोपही कृष्णा हेगडेंनी केला. कोणा महिलेला बदनाम करून मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धंनजय मुंडे यांना मी ओळखत नाही,” असेही कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केले.
२००८-०९ मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी २०१० मध्ये अनुभव घेतलाय, पण मी २००८- २००९ मध्ये फसणार होतो, पण माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही आणि हीचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय, असं मनीष धुरी म्हणाले. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, १९९७ मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या १६-१७ वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. २००६ मध्ये त्यांची बहिण इंदोरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे.
या सगळ्या आरोपांवर स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत. ‘२०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता,’ असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे.
















