मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, रजनी पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलंय. अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.
भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं, असं ते म्हणाले.