बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे. परंतू कर्नाटकात विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या सुनील कानुगोलू हे काँग्रेससाठी ज्यू. प्रशांत किशोर ठरले आहेत. सुनील कानुगोलू कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक होते. त्यांनीच या निवडणुकीत यशस्वी रणनीती आखली होती.
काँग्रेसच्या प्रमुख रणनितीकारांपैकी एक
सुनिल कानुगोल हे २०२२ पासून कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुख रणनितीकारांपैकी एक आहेत. त्यांना डेटा अनालिसिसचं तज्ज्ञ मानलं जातं. कर्नाटकच्या निवडणुकीत प्रचार, सर्वे आणि उमेदवारांच्या निवडीबाबत कानुगोलू यांनी रणनिती आखली होती. कानुगोल हे प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये (सिटिजन फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स ) होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या मोहीमेशी संबंधित एका टीमच्या प्रमुखांपैकी एक होते. दरम्यान, काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयामागे पक्षाचे चार चाणक्य असून एम. बी. पाटील, शशिकांत सेंथिल,जी परमेश्वर यांच्यासह कानुगोल हे एक प्रमुख चेहरा आहेत.
भाजपसोबत काम केल्याचाही अनुभव !
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपची रणनिती आखण्यातही कानुगोलू यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची देखील त्याने भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये अकाला दलसाठीही त्यांनी काम केलं आहे. तसेच कानुगोलूने २०१४ पूर्वी प्रशांत किशोर यांच्यासोबत देखील काम केले आहे. राज्यात ४० टक्क्यांची (भ्रष्ट ) सरकार, पे-सीएम आणि रेट कार्ड सारख्या धारधार प्रचार तंत्रामागे कानुगोलू यांचीच रणनीती असल्याची माहिती समोर येत आहे.
आता मध्यप्रदेशसह लोकसभेचीही जबादारी !
कॉंग्रेसने अगदी जाहीरनाम्यासाठीही त्यांची मदत घेतली होती. काँग्रेसने कानुगोल यांच्यावर मध्य प्रदेशचीही जबाबदारी सोपवली आहे. यासह लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखणाऱ्या काँग्रेस २०२४ च्या टास्क फोर्सचेही ते सदस्य आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या बेल्लारी येथील राहणाऱ्या कानुगोलू यांनी अमेरिकेत एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांना राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचेही श्रेय दिले जाते.