मुंबई (प्रतिनिधी) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोना या भयावह विषाणूनं राज्यात सुमारे 13 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एच.के.पाटील हे मागील आठवड्यात मुंबईला बैठकीला गेले होते. त्याबैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेक जण बैठकीला उपस्थित होते. मुंबईवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ जाणवत होते. त्यांनंतर त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान याआधी धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.
इतर नेते अडचणीत
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते. या शिष्टमंडळात अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते जाणार होते. मात्र एच. के. पाटील यांच्यासोबत गुरुवारी असलेले नेते वगळून इतर नेते आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे.