नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार नसल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना सभांबाबत विचार करण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे.