जळगाव (प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) आम्ही पाचवा उमेदवार निवडून आणणारच आहोत, त्यामुळे कॉंग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असे थेट आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.
याबाबत बोलतांना आमदार महाजन म्हणाले, विधानपरिषदेत पाचवा उमेदवार विजय करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. आमच्या उमेदवाराला लागणाऱ्या मतांचा कोटा आम्ही मिळविण्याची तजवीज केली आहे. त्यामुळे आमचा उमेदवार निवडूण येणारच याची आपण आजच खात्री देत आहोत. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीसोबत राहण्यास आमदार तयार नाहीत.
माविआचे आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील
महाविकास आघाडीचे नेते आमदारांना धाक दाखवित आहेत, त्यांना धमक्या देत आहेत, त्याला आता आमदार कंटाळले आहे. त्यामुळे हे आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील, असा दावाही त्यांनी केला. विधानपरिषदेत तर गुप्तमतदान पध्दती आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचेही आमदार आमच्या उमेदवाराला मतदान करतील. त्यामुळे काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन आमचा पाचवा उमेदवार विजयी करून ही निवडणूक बिनविरोध करावी. अन्यथा त्यांच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. हे आपण आजच खात्रीने सांगत आहोत असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेत भाजपचे तिसरे उमेदवार धनजंय महाडिक यांना निवडून आणण्याच्या प्रक्रियेत आमदार महाजनही होते. राज्यसभेतील यशानंतर ते आज जळगावी आले. आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. येत्या २० जूनला विधान परिेषदेसाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उदया (ता. १३) शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत भाजपच्या चार जागा निश्चित असल्या तरी त्यांनी दोन अतिरिक्त उमेवार उभे केले आहेत. मात्र, एकाची माघार घेऊन पाचव्या जागेसाठी पक्ष मैदानात उतरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रसेचे दोन उमेदवारांचा विजय निश्चित असले तरी कॉंग्रेसचा दुसरा उमेदवारासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला पाचव्या उमेदवारासाठी थेट २७ मतांची गरज आहे. तरीही भाजपने पाचव्या उमेदवारांच्या यशासाठी लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे.