जळगाव (प्रतिनिधी) आगामी काळात होणाऱ्या जळगाव जिल्हा बँके निवडणुकीसंदर्भात रविवारी कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या जिल्हाभरातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर केलीय. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, डी.जी.पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.सुरेश पाटील, आर.जी.पाटील, माजी आमदार रमेश पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कॉंग्रेसची ताकद सहकार क्षेत्रात वाढावी म्हणून जिल्हाभरातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा आग्रह असल्याने ही निवडणूक स्वबळावरच लढविण्याची तयारी झाली असल्याची माहिती ॲड. संदिप पाटील यांनी दिली. जिल्हा बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागा लढण्यासाठी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले. १५ तालुक्यांमधून जो ही निवडणुकीत टक्कर देवून विजयी होवू शकतो असे उमेदवार कॉंग्रेसकडे असून, ही निवडणूक स्वबळावर लढविण्यावर कॉंग्रेस ठाम असल्याचे सांगितले.