नांदेड (वृत्तसंस्था) आज राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आज या जागांचा निकाल लागला. नांदेड जिल्ह्यात देखील अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यापैकी अर्धापूर, नायगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे.
नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल १७ पैकी १७ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे.
काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत आपली सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत १७ पैकी ६ जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला आहे. माहूरला १ आणि अर्धापूरला २ मिळून त्यांना नांदेड जिल्ह्यात फक्त ३ जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ३३ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.