जामनेर (प्रतिनिधी) शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला अखेर दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी शालार्थची प्रलंबित फाईल मंजूर केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नाव नव्हता. शिक्षण उपसंचालकांच्या याच जाचाला कंटाळून जामनेर येथील एकलव्य या शिक्षण संस्थेत नोकरी असलेल्या भारत बाबुलाल रेशवाल शिक्षकाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. . वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केल्यामुळे थोडक्यात त्यांचे प्राण बचावले होते.
भारत रेशवाल यांची पत्नी अंकिता रेशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जामनेर येथील एकलव्य शिक्षण संस्था व संस्थेत कार्यरत शिक्षक भारत बाबुलाल रेशवाल यांच्या वाद होता. त्यामुळे रेशवाल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर रेशवाल यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२० रोजी भारत रेशवाल पुन्हा शिक्षक म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेत रुजू झाले. रूजू झाल्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत रेशवाल यांनी स्वतः प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे जमा केला. परंतू तब्बल चार महिन्यांपासून ही फाईल शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडे पडून होती. इतर फाईलवर उपासनी यांनी मंजूरी दिली मात्र, रेशवाल यांच्या फाईल अडकवून ठेवल्याचा आरोप रेशवाल यांनी केला होता. फाईल प्रलंबित असल्याने रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही मिळालेला नव्हता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी ५ ऑक्टोबर रोजी शिक्षण उपसंचालक उपासनी यांनी शालार्थची फाईल मंजूर केल्याचे पत्र रेशवाल यांना पाठवले आहे.
काय म्हटले आहे आदेशात
पंडित दिनदयाल उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ जामनेर संचलित एकलव्य प्राथमिक विदयामंदिर, जामनेर या शाळेतील श्री. भारत बाबुलाल रेशवाल, उपशिक्षक यांचे नांव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यास अनुसरून विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक स्तरावर करण्यात आलेल्या छाननी अंती परिपूर्ण असलेल्या प्रस्तावातील श्री. भारत बाबुलाल रेशवाल, उपशिक्षक यांचे नांव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
शालार्थ प्रणालीमध्ये नांव समाविष्ट करण्यास मान्यता दिलेल्या श्री. भारत बाबुलाल रेशवाल, उपशिक्षक यांची माहिती या सोबत जोडलेल्या प्रपत्र १ ते १३ मध्ये दर्शविण्यात आलेली आहे. सदर माहितीची शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात आलेली असून उर्वरित माहितीसाठी शाळेच्या लॉग इन ला (Log in) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उर्वरित माहिती शाळेने भरुन जिल्ह्याच्या अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) यांच्या लॉग ईनला पाठवून मान्य करून घ्यावयाची आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतरच त्यांचे नांव शालार्थ प्रणालीत वेद्रत देयकात समाविष्ट करण्यात येईल.
















