लखनौ (वृत्तसंस्था) पोलीस मुख्यालयात तैनात महिला कॉन्स्टेबल रुचि सिंगच्या हत्येप्रकरणी नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्याची पत्नी आणि आणखी एका मित्राला अटक करण्यात आली आहे. कालीमाता परिसरातील नाल्यात रुची सिंहचा बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.
गळा दाबून तिची हत्या आणि मृतदेह नाल्यात फेकला
या प्रकरणी डीसीपी अमित आनंद म्हणाले की, महिला पोलिसाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला होता. ५ वर्षापूर्वी तिची नायब तहसीलादारासोबत फेसबुकवरुन ओळख झाली. त्यानंतर दोघं जवळ आले. महिला पोलिसाने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने तहसीलदारावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या तहसीलदारानेच हे षडयंत्र रचलं. त्याने रुचीला फोन करुन पीजीआय हॉस्पिटलला बोलावले. तेथे मित्राच्या मदतीनं तिला नशेचं औषध देत बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह जवळील नाल्यात फेकला.
जुन्या प्रेमाची झाली आठवण !
रुचीचं लग्न जून २०१९ मध्ये कॉन्स्टेबल नीरजसोबत झालं होते. डिसेंबर २०१९ ला ती पोलीस खात्यात भरती झाली. परंतु त्याआधीपासून प्रयागराजचे नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव याच्याशी तिचे प्रेमसंबंध सुरु झाले. नोकरी मिळाल्यानंतर तिला जुन्या प्रेमाची आठवण झाली. त्यासाठी तिने आधी पती नीरजवर हुंड्यामुळे छळाचा आरोप करत त्याच्याशी घटस्फोट घेतला. काही महिन्यांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रुचीनं पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकला. कुठल्याही परिस्थितीत तिला नायब तहसीलदारासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत असे. पद्मेशनं त्याच्या पत्नीसोबत हे सगळं सत्य सांगून टाकलं. त्यानंतर रुचीचे पत्नीसोबत वाद झाले. घटनेच्या काही दिवस आधी रुचीनं पद्मेशला कॉल केला परंतु तो पत्नी प्रगतीनं उचलला. त्यावेळी फोनवरून त्या दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर पद्मेशनं हत्येचं षडयंत्र रचलं.
फेसबुकवर झाली मैत्री
पोलीस तपासात आढळले की, फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर महिला पोलीस आणि तहसीलदार यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर प्रेमात रुपांतर झालं. परंतु ते दोघंही विवाहित होते. आता या प्रकरणी पोलिसांनी तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, पत्नी प्रगती आणि सहकारी नामवर सिंह याला अटक केली आहे. महिला शिपायाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याचं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी हत्या कशी केली याबाबत आरोपींकडून शोध घेत आहेत.