बीड (वृत्तसंस्था) इमारतीचे बांधकाम करणाऱ्या काका-पुतण्याचा विद्युत वाहक तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडलीय. शेख फेरोज इस्माईल (वय 38) व शेख समीर जुबेद (वय 26 दोघे रा. संजयनगर, गेवराई) अशी मयतांची नावं आहेत. दरम्यान, या शॉकने दोघांच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला होता.
समीर शेख व फेरोज शेख हे दोघेही मन्यारवाडी येथील रामजी डिंगरे यांच्या घराचे काम करत होते. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरावरून गेलेल्या विद्युत तारेला समीरचा हात लागला. यावेळी तो ओरडल्याने बाजूलाच असलेले चुलते पाठविण्यात फेरोज त्याला वाचविण्यासाठी धावले. यामुळे ते देखील चिकटले. दोघांचाही क्षणार्धात मृत्यू झाला. या घटनेत दोघांच्याही मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला होता. समीरच्या पश्चात पत्नी, दोन मुले तर फेरोजच्या यांच्या पश्चात पत्नी चार मुले असा परिवार आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला तर संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.