पुणे (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पुण्यातील गुन्हे शाखाकडून गोसावीला अटक करण्यात आली आहे.
नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याच सांगितले जात होते. दरम्यान, काल पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी येऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.अखेर पुणे पोलिसांकडून गोसावीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात शाहरूख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा पंच प्रभाकर साईल यानं केला आहे. तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून गेले बरेच दिवस पुणे पोलीस त्याच्या शोधात होते.