चेन्नई (वृत्तसंस्था) तामिळनाडूचे (tamil nadu) उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हिंदी भाषिक पाणीपुरी विकत असल्याचा दावा केला. हिंदी हे ऐच्छिक असले पाहिजे आणि सक्तीचे नाही.
मंत्री पोनमुडी भरथियार विद्यापीठ कोईम्बतूर येथे आयोजित दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी उपस्थित होते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून शिकवली जात असताना हिंदी का शिकली पाहिजे असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कोईम्बतूरमध्ये हिंदी भाषिक पाणीपुरी विकतात, असंही उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी म्हणाले. पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या फायदेशीर पैलूंची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. पण राज्य सरकार फक्त दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्धार असल्याचा दावा केला. तामिळनाडूची शिक्षण व्यवस्था भारतातील सर्वोत्तम आणि प्रगत आहे. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकू शकतात, असंही ते म्हणाले. हिंदी भाषक सेवाचकरी, रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणे यांसारखी छोटी-मोठी नोकरी करत आहेत. आता इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, जी हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असंही ते म्हणाले.