यावल (प्रतिनिधी) व्दितीय मराठी इंग्रजी माध्यमाच्या पेपरला परिक्षा केंद्रा बाहेर एका रिक्षामध्ये बसून एक शिक्षिका दोन विदयार्थ्यांना कॉपी लिहुन देण्यास मदत करत असल्याचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार यावल तालुक्यातील किनगाव परीक्षा केंद्रावर सोमवारी घडला असुन त्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत यावल पोलिसात मुख्याध्यापिकेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
इयत्ता बारावी बरोबरच दहावीच्या परीक्षा देखील सुरु झालेल्या आहेत. त्यात दहावी सीबीएससी पॅटर्नच्या परीक्षा देखील सुरु आहे. सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी व्दितीय मराठी व इंग्रजी माध्यमाचा पेपर असल्याने किनगाव परीक्षा केंद्राच्या परिसरात एका रिक्षामध्ये बसून एक शिक्षिका कॉपी करण्यासंदर्भात व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्यात कारवाई होत नसल्याने कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दरम्यान, काल झालेल्या कॉपीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी धनके यावल पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यांच्या फिर्यादीवरुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीआय प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. वसंत बेलदार हे करीत आहेत.