नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचीच संख्या केवळ वाढत नाही तर आता मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ लाख ०१ हजार ०७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे. देशात दररोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, दररोज साडेतीन हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहेत. मात्र, गेल्या २४ तासांतील मृतांची संख्या झोप उडवणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेनुसार, देशात २४ तासांत ४ लाख १ हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच ४ हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधित रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी ५४ हजार ०२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ४९ लाख ९६ हजार ७५८ झाली आहे. तर ८९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७४ हजार ४१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी ६२ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर ३७ हजार ३८६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ जण कोरोनामुक्त झाले आहे. मागील २४ तासांत २ लाख ६८ हजार ९१२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर मुंबईतील कालची कोरोनाबाधितांची संख्या ३०४० एवढी होती आणि ७१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे.