नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, की कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरेल. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असं वाटत नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित झाले नाहीत. त्यामुळेचे तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही किंवा तसे कोणते संकेतही मिळालेले नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारी पाहिली तर यात खुप समानता आहे. यामध्ये लहान मुलं सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. तसेच मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत. कोरोना व्हायरस तोच आहे, त्यामुळे असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, असंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.
तिसऱ्या लाटेत लहाना मुलांना सर्वाधिक धोका आहे, हा दावा ज्यांनी केला आहे त्याचं म्हणणे आहे की अद्याप मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त झालेला नाही. म्हणूनच तिसऱ्या लाटेत याचा संसर्ग लहान मुलांना जास्त होऊ शकतो. मात्र यापुढे मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, याचे कोणतेही पुरावे नाहीत, असंही डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं.
ब्लॅक फंगसवरही आरोग्य मंत्रालयानं दिली प्रतिक्रिया
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य आजार नाही. रोगप्रतिकारशक्ती अधिक नसणं हेच ब्लॅक फंगसचं कारण आहे. नाकात त्रास होणं, घसा दुखणं, चेहऱ्यावरील संवेदना कमी होणं तसंच पोटात दुखणे, ही ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत. मंत्रालयानं म्हटलं, की याच्या वेगवेगळ्या रंगांवर लक्ष देण्यापेक्षा लक्षणांवर लक्ष दिल्यास उपचार लवकर होऊ शकतील.