नाशिक (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या वाढत आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
“जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे. या चर्चेतूनच जोखीमेची शक्यता पाहता शाळा सुरु न करता तूर्तास संस्थगित ठेवणे योग्य राहिल असा सूर सर्वांचा दिसून आला. जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनीही डिसेंबर जानेवारी हे महिने बालकांसाठी विविध आजारांनी अतिजोखिमेचे असतात त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे असलेली बालरोगतज्ञांची उपलब्धता, बालरुग्णालये त्यांची कोव्हिड-१९ च्या अनुषंगाने असलेली क्षमता, लागणारे संभाव्य मनुष्यबळ, असलेली आणि लागणारी वैद्यकीय साधनसामुग्री यांचाही अंदाज घेणे गरजेचे आहे”, असं पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. “आजपर्यंत आपण सर्वसाधारण रुग्णांसाठीच्या कोरोना संसर्गाची लक्षणे आणि गुणधर्म यावर आधारित आपली आरोग्य सेवाविषयक क्षमतावृद्धी केली आहे. बालकांच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लाटेची गुणधर्म आणि शक्यतांच्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतांची चाचपणी करुनच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा असे वाटते”, असंही ते म्हणाले. सद्यस्थितीत बाधित रुग्णांना दहा मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे, दिवसाला ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल अशी व्यवस्था आपण करून ठेवली आहे. नाशिक जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांच्या पुढे गेल्याची माहितीदेखील भुजबळ यांनी या बैठकीत दिली. कोविडबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात घेण्यात आली.
पेशंट वाढले तर आहे ते कोव्हिड सेंटर सूरु राहतील आणि गरज पडल्यास आणखीन सेंटर सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे, असे भुजबळ म्हणाले. जिल्ह्यातील सुमारे ४० शिक्षक तपासणीतून कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे.