नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकारणातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना लस टोचली आहे. या यादीत आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश झाला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे.
राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी पीडित असलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. या वयोमर्यादेत येणारे सर्व ज्येष्ठ नागरिक सरकारी दवाखान्यात जाऊन मोफत लस घेऊ शकतात. त्याचबरोबर ठराविक खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, खासगी दवाखान्यात तुम्हाल २५० रुपये मोजावे लागू शकतात.
कोरोना लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील २९ खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे.















